Ad will apear here
Next
एक तरी ओवी अनुभवावी...


नित्य-अनित्य
ज्ञानेश्वरीतील दृष्टांत म्हणजे भाषेची सौंदर्यस्थळं... भाषेचं लेणं! माऊलींनी भाषेला घातलेल्या या लेण्यांचं, या अलंकारांचं वैशिष्ट्य असं, की हे अलंकार नुसतीच भाषेची शोभा वाढवत नाहीत, तर तिला अधिक सुगम, अधिक सोपी करतात.

नित्य-अनित्य याचा ऊहापोह करताना माऊलींच्या शब्दप्रभेचा वेल असाच बहराला आला आहे.

नित्य म्हणजे जिचा कधीही नाश होत नाही, जी अत्यंत शुद्ध, पवित्र आणि अविनाशी आहे अशी वस्तू! या नित्य वस्तूच्या अमर्याद, सर्वव्यापी, सर्वसाक्षित्वामुळे तिला शुद्ध चैतन्य असेही म्हणतात.

तुमच्या-माझ्या नामरूपात्मक जगात मात्र ही नित्य वस्तू अनेक उपाधींनी झाकली गेली आहे. केवळ तत्त्वज्ञ तिला जाणू शकतात.

सर्वव्यापी, नित्य असूनही जाणता येत नाही आणि त्यासाठी तत्त्वज्ञान अभ्यासणे आवश्यक... असे म्हटल्यावर सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया, ‘मला समजण्यास अवघड आहे’ अशीच होते.

माऊलींची दृष्टांत लेणी इथेच तुमच्या-माझ्यासाठी धावून येतात. माऊली म्हणतात...

सलिली पय जैसे। एक होऊनि मिनलें असे।
परी निवडुनी राजहंसे। वेगळे कीजे।।
की अग्निमुखे किडाळ। तोडोनीया चोखाळ।
निवडिती केवळ। बुद्धिमंत।।
ना तरी जाणिवेच्या आयणी। करिता दधि कडसणी।
मग नवनीत निर्वाणी। दिसे जैसे।।
कीं भूस बी एकवट। उपणिता राहे घनवट।
तेथ उडे ते फळकट। जाणों आले।।

माऊली चार दृष्टांत देतात. राजहंसाचा, सोनाराचा, नवनीताचा आणि धान्याचा!

आपल्या नीरक्षीरविवेक बुद्धीने राजहंस, एकत्र झालेल्या दूध-पाण्यातील दूध प्राशन करतो. मिसळून गेलेल्या पदार्थातील सत्त्व शोधण्याची शक्ती त्याच्याकडे असते.

सोने अग्नीत तापवल्यावर त्यातील अशुद्धता नष्ट होते. शुद्ध सोने मिळवण्याची कला सोनाराच्या अंगी असते.

दही घुसळल्यावर त्यात दडलेले लोणी बाहेर येते. शुद्ध बुद्धीच्या अशाच मंथनाने सत्त्वरूप असलेले नवनीत प्रकट होते.
कोंडा असलेले धान्य पाखडल्यावर भूस उडून जाते आणि स्वच्छ धान्य खाली उरते.

नित्य असणारे शुद्ध चैतन्य हे असेच... दूध-पाण्याप्रमाणे, धान्य आणि भूस याप्रमाणे एकमेकांत मिसळून गेलेले असते. किंवा शुद्ध सोन्यातल्या कणांप्रमाणे, ताकातल्या नवनीताप्रमाणे दडून राहिलेले असते.

शुद्ध, नित्य असे त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी बुद्धीने जाणीवपूर्वक मंथन करावे लागते. प्रयत्नपूर्वक अशुद्ध पाखडून दूर करावे लागते. अग्नीत तापवून कसाची परीक्षा करावी लागते आणि नीरक्षीरविवेकाने सत्त्व शोधावे लागते.

या दृष्टांतातील आणखी एक विचार असा, की वस्तुतः दूध, सोने, नवनीत आणि धान्य यांचे शुद्ध स्वरूप तिथेच असते आणि ‘नित्य’ असते. त्यांचा शोध अन्यत्र कुठे घ्यावयाचा नसतो. पाणी दूर केले की दूध तिथेच उरते. कोंडा दूर केला की धान्य तिथेच उरते. ताकाचा अंश दूर केल्यावर त्यातच दडलेले नवनीत मिळते आणि अशुद्धता दूर केल्यावर शुद्ध सोने तिथेच असल्याचे लक्षात येते.

नित्य असणारे आत्मतत्त्व आपल्या असेच निकट आहे. परंतु नामरूपात्मक, आभासी सृष्टीतील उपाधी त्याला व्यापून आहेत. म्हणून आपल्या सदासर्वदा निकट असूनही हे आत्मतत्त्व सुप्त, झाकलेले राहते. त्यातील चेतनेची साधी जाणीवही आपल्याला होत नाही. सर्व उपाधी जाणीवपूर्वक दूर केल्या, तर मात्र आपल्याच अंतरंगात नित्य असणाऱ्या शुद्ध चैतन्याची जाणीव होऊ लागते. जे अनित्य होते, ते साहजिकच नाश पावते व जे नित्य आहे, ते चैतन्यस्वरूप नवनीत हाती लागते.
माऊलींनी इतका गहन विषय किती सोपा करावा.. किती आपल्या आकलनाच्या कक्षेत आणून ठेवावा...

राजहंसाचा दृष्टांत कविकल्पना वाटू शकते, सोनाराच्या उदाहरणात माहितीवर विसंबावे लागते... म्हणून, दह्याचे मंथन आणि धान्याचे पाखडणे या स्वयंपाकघरातल्या सर्वमान्य गोष्टी सांगाव्यात...

म्हणूनच... एक तरी ओवी अनुभवावी...!

- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYYZCN
Similar Posts
तुमचा अनुग्रहो गणेशु... श्रीगणेशाची कृपा म्हणजे काय हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीतील पाच ओव्या आणि त्या ओव्यांतील शब्दरत्ने वेचण्याचा प्रयत्न करू या. आपले सद्गुरू हे प्रत्यक्ष गणेशाची विभूती आहेत असं सांगणाऱ्या या पहिल्या पाच ओव्या! सद्गुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना माउलींच्या वाग्वैभवाला नेहमीच उधाणाची भरती यावी तसं झालंय.
वक्तृत्वाचे वऱ्हाडी... वक्तृत्वाचे वऱ्हाडी... माऊलींचा शब्दच किती प्रेमाचा.. कृष्णाची वाणी आणि अर्जुनाची जिज्ञासा यांची सोयरीक सांगणारा... अर्जुनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे ही माझ्या वाणीची जणू प्रेमाची बांधिलकी आहे असं नकळत सूचित करणारा... कृष्णार्जुनाचं नातं अधिकच गहिरं करणारा...
विश्व ब्रह्मचि ठेले आपल्याला द्वंद्वातीत नाही होता आलं, तरी आपापल्या आयुष्यातली द्वंद्वं ओळखून निदान त्या द्वंद्वांची तीव्रता तरी कमी करता यायला हवी. यशाचा माज नको आणि अपयशाने खचून जाणं नको. सुखाला अनंत काळासाठी कवटाळणं नको आणि दुःखाला टाळणं नको. अपयशाला पचवता यावं आणि दुःखाला भिडता यावं. श्रीमंतीतला अवास्तव अभिनिवेष टाळता
करुणा आणि अष्टक... ‘करुणाष्टके’ असं म्हटल्याक्षणी ‘अनुदिन अनुतापे तापलो रामराया’ किंवा ‘दासा मनी आठव विसरेना, तुजवीण रामा मज कंठवेना’ या कवितांचे चरण मनात घोळू लागतात. उपासनेच्या, साधनेच्या काळात पंचवटीच्या रामाच्या सन्मुख उभे असलेले समर्थ डोळ्यासमोर दिसू लागतात; आणि मग रामाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला भाव, त्यातून जन्मलेली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language